Friday, November 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे;* *पुणे...

पुण्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे;* *पुणे शहरासह जिल्ह्यात कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही* *- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*

 

 

*प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश; कोयता गँगसह ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करा*

 

पुणे, दि. 27 :- पुणे शहर आणि जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्व आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. या शहराची शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखणे ही पोलीस दलाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गुन्हेगारी प्रवृत्तींचे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

 

पुणे येथील शासकीय विश्रामगृहात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस विभागाच्या कामकाजाचा, कायदा व सुव्यवस्थेचा उपमुख्यमंत्री पवार यांनी आढावा घेतला. यावेळी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपकुमार गिल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, शिवाजीनगर न्यायालय परिसरात घडलेली खुनी हल्ल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांनी केवळ घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर द्यावा. गुन्हेगारी हालचालींची गोपनीय माहिती संकलित करणारी यंत्रणा अधिक सक्षम आणि सक्रिय करावी. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर, कोयता गँगवर तसेच ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर वचक निर्माण करावा.

 

शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त आणि सुरक्षा व्यवस्था वाढवावी. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवून नियमित तपासणी करावी. वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पोलीस विभागाने आपली कार्यक्षमता आणि कामगिरी अधिक उंचावण्याची गरज असल्याच्या सूचना ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

 

शिवाजीनगर न्यायालय परिसरातील घटनेवरून संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य ठरणार नाही. घडलेली घटना दुर्दैवी असली तरी पोलीस दल निश्चितपणे आपल्या कामगिरीत सुधारणा करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस दलाचा धाक आणि दबदबा आगामी काळात नागरिकांना निश्चितपणे दिसून येईल, असेही त्या म्हणाल्या.

 

पुणे शहराची शांतता, सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क, सक्षम आणि परिणामकारकपणे काम करावे. या कामात नागरिकांनीही पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

*****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments