‘‘इतिहास ही शक्ती आहे , त्याचा सातत्याने अभ्यास केला पाहिजे. त्यातून योग्य तो धडा घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाचे विविध अंगानी संशोधन करून ते साहित्यातून मांडले पाहिजे. त्यामुळे समाज बलशाली होईल. असा प्रयत्न श्री. रोहन बेनोडेकर यांनी ‘वाघनखं’ या कादंबरीतून प्रभावीपणे केला आहे.’’ असे विचार समाजसेवक व साहित्यिक श्री. माधव भांडारी यांनी रोहन बेनोडेकर लिखित ‘वाघनखं’ या स्नेहल प्रकाशन निर्मित कादंबरीचे प्रकाशन करताना मांडले.
दरम्यान इतिहास अभ्यासक व साहित्यिक मोहन शेटे म्हणाले, ‘अफझलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्या प्रसंगाने हिंदुस्थानातील हिदूंची अस्मिता जागी झाली. त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव झाली. त्यामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. प्रतापगड मोहिमेचे स्मरण हे प्रेरणादायी आहे. इतिहासाचा अभ्यास करत उज्ज्वल भविष्य निर्माण करू या.’’
या प्रसंगी ‘वाघनखं’ कादंबरीचे लेखक रोहन बेनोडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्नेहल प्रकाशनचे श्री. रवींद्र घाटपांडे यांनी प्रास्ताविक केले, तर प्राचार्य श्याम भुर्के यांनी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास रसिक इतिहासप्रेमींनी उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दिला.


