१३ मे रोजी होणा-या मावळ लोकसभा निवडणूक मतदानासाठी एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमात उपस्थितांनी “लोकशाहीवर निष्ठा ठेवून, निवडणुकांचे पावित्र्य राखून निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू” अशी शपथ घेऊन मतदान करण्याचा निर्धारही व्यक्त केला.
*औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मोरवाडी पिंपरी-*
महाराष्ट्र शासनातर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी पिंपरी येथील अध्यक्ष प्रशिक्षण संस्थेमध्ये जर्मन भाषा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी जिल्हा शिक्षण संस्थेचे जर्मन भाषा विषय तज्ञ विक्रम मोरे,फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सविता खेळकर, श्रुती परांजपे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, पिंपरी विधानसभा कार्यालयाचे नोडल अधिकारी मुकेश कोळप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, संस्थेचे गटनिर्देशक मनोज ढेरंगे, शर्मिला कारबळे तसेच जर्मन भाषा प्रशिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मुकेश कोळप यांनी मतदान प्रक्रियेबाबत तसेच मतदान केंद्रावर असणा-या सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली, या प्रशिक्षण सत्रात १३ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रथमच मतदान करणाऱ्या नवोदित मतदारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी तसेच विद्यार्थ्यांनी मतदानाची शपथ घेऊन मतदानाचा प्रचार व प्रसार करून आम्ही आमचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू असा निर्धार व्यक्त केला.
*श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ*
पिंपरी-चिंचवड रस्त्यावरील बकाऊ वुल्फ काॅलनी येथील स्वामी समर्थ सत्संग मंडळ या ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे तसेच त्यांचे सहकारी,आरतीस उपस्थित शेकडो जणांनी पिंपरी विधानसभेचे नोडल अधिकारी मुकेश कोळप, प्रफुल्ल पुराणिक यांच्या उपस्थितीत मतदान करण्याची शपथ घेतली.
*तक्षशिला मित्र संघ..बुध्दविहार*
प्राधिकरण येथील तक्षशिला मित्र संघ बुध्दविहार येथेही मतदान जनजागृती करण्यात आली, या कार्यक्रमात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. महिला मतदारांनी मतदानाची शपथ घेऊन “आम्ही सर्वजणी मतदान करणार आहोत शिवाय आमच्या भागातील सर्व महिला आणि पुरुषांनी देखील मतदान करावे यासाठी जनजागृती करणार आहोत असे सांगून शंभर टक्के मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला” यावेळी बुध्दविहाराचे पदाधिकारी प्रताप सोनवणे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.


