Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्राह्मण समाजावर होणारी टीका अनाठायी - स्वामी गोविंद देवगिरी महाराज*

ब्राह्मण समाजावर होणारी टीका अनाठायी – स्वामी गोविंद देवगिरी महाराज*

पुणे, दि. २६ – ब्राह्मण समाजावर होणाऱ्या अनाठायी टीकेला अभ्यासपूर्ण उत्तर दिले पाहिजे, यासाठी स्वतंत्र “थिंक टँक” निर्माण केला पाहिजे. ब्राह्मण समाजाने कायम राष्ट्रहित जोपासले आहे, असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी आज येथे केले. आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुरस्कारार्थींसह ज्येष्ठ उद्योजिका मंजुषा भावे, संपादक भालचंद्र कुलकर्णी व संचालक संजय ओर्पे उपस्थित होते. यंदाच्या पुरस्कारांमध्ये – ॲनलायझर न्यूज वृत्तवाहिनीचे संपादक सुशील कुलकर्णी यांना “ब्राह्मण भूषण” पुरस्कार, योगगुरू मनाली देव यांना “इंदुमती वसंत करिअर भूषण” पुरस्कार, युवा कीर्तनकार संज्योत केतकर यांना “डॉ. रामचंद्र देखणे स्मृती” पुरस्कार आणि महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे विश्वस्त काका धर्मावत यांना “भगवान परशुराम ब्राह्मण संस्था” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी स्वामी गोविंद देवगिरी महाराज पुढे म्हणाले की, देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि रक्षणासाठी सदैव कार्यरत असणारा ब्राह्मण समाज आहे. राष्ट्र सर्वप्रथम हीच भूमिका प्राचीन काळापासून ब्राह्मण समाजाने जपली आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती, पैसा, राजकीय विचार, पोटशाखा कितीही भिन्न असल्या तरी त्यात काहीही बदल झालेला नाही. ब्राह्मण समाजातील सर्व संस्था, संघटना एक झाल्यास हिंदू धर्माची पताका पुढे नेण्यास ती मोठी शक्ती ठरेल. आपल्यातला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका तर आपल्यावरील टीकेला विवेकाने उत्तर द्या असेही यावेळी त्यांनी सांगितले.
पुरस्काराला उत्तर देताना सुशील कुलकर्णी म्हणाले की,
आरक्षणाची गरज नसणारा ब्राह्मण समाज आहे. सध्याच्या काळात नव्याने ब्राह्मण व्यावसायिक, उद्योजक तयार झाले पाहिजेत. विद्यार्थीदशेपासून व्यावसायिक शिक्षण आणि अर्थसहाय्य याची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण द्यायला हवे. यासाठी सुसज्ज वसतिगृह देखील ब्राह्मण संस्थांनी एकत्र येऊन उभे केले पाहिजे.
यावेळी उद्योजिका भावे म्हणाल्या की, आता ब्राह्मण चेंबर ऑफ कॉमर्स सुरु झाले पाहिजे. ब्राह्मण समाज देखील सधन व्हावा आणि ग्रामीण भागात मोठे उद्योग उभे केले पाहिजेत. जेणेकरून कोणीही गरीब राहणार नाही.
सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना संपादक भालचंद्र कुलकर्णी म्हणाले की, मासिकाचे व्यासपीठ सर्वांसाठी खुले आहे. समाजावर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आणि गरजू ब्राह्मणांना मदत देण्यासाठी काम केले जात आहे. संचालक ओर्पे यांनी मासिक, उद्योजक डिरेक्टरी, ब्राह्मण रत्ने ग्रंथ, याबाबतची सविस्तर माहिती यावेळी सांगितली. प्राजक्ता बोधनकर यांनी मानपत्र वाचन केले तर चित्राली कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमात लेखक अरविंद दंडगे यांच्या “श्रीरामायण सुभाषितानी” व अविनाश हळबे यांच्या “मृत्योर्मा अमृतं गमय” या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
————-
🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments