पुणे, दि. 10 : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ अर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील ऐतिहासिक वारसा वास्तू संवर्धन तज्ज्ञ आणि प्राध्यापक डॉ. वैशाली लाटकर यांनी नुकताच व्हेनिस येथे ‘ वास्तू संवर्धन क्षेत्रातील शिक्षण’ या विषयावर शोधनिबंध सादर करून जागतिक पातळीवर या संशोधनासाठी लागणाऱ्या प्रकल्पाची रूपरेषाही स्पष्ट केली. निमित्त होते कमिटी इंटरनॅशनल दे फॉर्मेशन (सीआयएफ) या ऐतिहासिक स्मारके आणि स्थळांच्या जतन संवर्धनाच्या शिक्षण-प्रशिक्षण आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील समितीच्या वार्षिक परीषदेचे. या परिषदेच्या आयोजन समितीच्या सदस्य म्हणून डॉ. लाटकर तिथे गेल्या होत्या.
या परिषदेचा विषय ‘शांती आणि युद्ध : वारसा प्रशिक्षण संवर्धनासाठी का पुर्ननिर्माणासाठी’ हा असून जगभरातील अनेक तज्ज्ञांसह भारतातर्फे डॉ. लाटकर यांनी या परिषदेत सादरीकरण केले. त्या या समितीत उपाध्यक्ष असून आशिया खंडाचे प्रतिनिधीत्व करतात. बीएनसीएतील संस्कृती अध्ययन केंद्रातर्फे त्या ऐतिहासिक वारसा या विषयावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.
याबाबत डॉ. लाटकरांचे अभिनंदन करताना बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप म्हणाले की, अशा ठिकाणी सादरीकरण करणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे आहे. कारण ही समिती आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळे परिषदेची (आयकोमॉस) जागतिक वारसा या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेचे उपांग आहे.
डॉ. लाटकर म्हणाल्या की, ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वास्तूसंवर्धन क्षेत्राच्या कार्यकक्षा दिवसेंदिवस विस्तारत असून त्यातून निर्माण होणारी नवनवी आव्हाने कशी पेलावीत यासाठी हे संशोधन उपयोगी ठरू शकेल. तसेच भारतातील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे देशाचा इतिहास आणि परंपरा यांचा अभ्यास होऊ लागल्याने या संशोधनास विशेष महत्व प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे.


