पुणे –
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली व ऐतिहासिक महत्त्व असलेली आणि विद्यार्थ्यांचे स्फूर्तीस्थान असलेली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली त्यांच्या पुण्यतिथी निमित्त नागरिकांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती.
डीईएस नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत यांच्या हस्ते सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपाध्यक्ष ऍड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, डॉ. विजय तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे फर्ग्यूसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना सन १९०२ ते १९०५ या कालावधीमध्ये फर्ग्यूसन महाविद्यालय मुलांचे वसतिगृह क्रमांक १ मधील खोली क्रमांक १७ मध्ये राहत होते. या खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अर्धपुतळा आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मिळालेल्या डी. लिट. पदवीचे दोन गणवेश ठेवण्यात आले होते. दिवसभर नागरिकांनी सावरकरांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.


