Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुलांवर जिजाऊंचे संस्कार करणे ही काळाची गरज : महंत श्रीकांत दास धुमाळ...

मुलांवर जिजाऊंचे संस्कार करणे ही काळाची गरज : महंत श्रीकांत दास धुमाळ वारजेत ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात

 

 

पुणे, वारजे (प्रतिनिधी) : “आजच्या धावपळीच्या युगात केवळ पाश्चात्य शिक्षण पुरेसे नाही, तर आपल्या मुलांवर हिंदू धर्माचे आणि संस्कृतीचे संस्कार करणे ही काळाची गरज आहे. महिलांनी जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कालसुसंगत आपला कुलधर्म जोपासला पाहिजेत,” असे प्रतिपादन धर्माचार्य महंत श्रीकांत दास धुमाळ महाराज यांनी केले.

 

वारजे नगरामधील रामनगर वस्तीत सकल हिंदू समाज आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने कै. वनाबाई बराटे शाळेच्या प्रांगणात ‘विराट हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी आशीर्वचन देताना ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात शंखनाद, दीपप्रज्वलन, भारत माता पूजन आणि सवत्स धेनु (गाय-वासरू) पूजनाने झाली. संमेलनाचे संयोजक ह.भ.प. भाऊ महाराज फुरसुंगीकर यांनी वारकरी शैलीत प्रास्ताविक करताना हिंदू संमेलनाची आवश्यकता साध्या शब्दांत मांडली.

 

प्रमुख वक्ते श्री. मुकुंदराव सहस्त्रबुद्धे यांनी ‘संघाच्या कार्याची १०० वर्षे’ या विषयावर मांडणी करत राष्ट्र उभारणीतील योगदानाची माहिती दिली. वंदनाताई नवघरे यांनी ‘पंचपरिवर्तन’ विषयावर मार्गदर्शन करताना राम-शबरी संवादाचे उदाहरण देऊन सामाजिक समरसतेचे महत्त्व पटवून दिले. या संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे स्थानिक बालकलाकारांनी सादर केलेले महाराष्ट्र गीत, शिववंदना, शंभूवंदना आणि पोवाडा हे सांस्कृतिक कार्यक्रम ठरले. कार्यक्रमास माजी महापौर दिलीप बराटे, नगरसेवक भारतभूषण बराटे, सचिन दोडके, सायली वांजळे, किरण बारटक्के, सचिन बराटे, पराग ढेणे आदी मान्यवर उपस्थित होते. चंद्रकांत पंडित यांनी सूत्रसंचालन केले, तर चेतन गोंडाळ यांनी आभार मानले.

 

समरसतेचा संदेश ः

रामनगर वस्तीतील सर्व जाती-पंथाच्या नागरिकांनी गेल्या दीड महिन्यापासून या संमेलनासाठी अथक परिश्रम घेतले होते. विशेषतः वंचित वस्तीतील तरुण आणि मुलांनी भोजन व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी अत्यंत शिस्तबद्धरीतीने पार पाडून सामाजिक एकजुटीचा आदर्श सर्वांसमोर ठेवला.

———

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments