पुणे,18 ऑगस्ट 2026 : कठिण परिस्थितीत आपली दु:ख बाजूला ठेवून अवयवदानाला संमती देणाऱ्या अवयवदात्याच्या कुटुंबाच्या हस्ते नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर येथे 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात आले.आपल्या भावाला मेंदूमृत घोषित केल्यानंतर अवयवदानासाठी संमती देणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सख्खे भाऊ नितीन कामटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याचा हेतू अवयवदात्याच्या कुटुंबियांना महान कार्याबद्दल मानवंदना देणे आणि अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करणे हे होते.
नितीन कामटे म्हणाले की,अवयवदानामुळे अनेक लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नवी आशा निर्माण होते. अवयवदाता इतरांच्या आयुष्यात जिवंत राहत नवसंजीवनी देतात.म्हणून आम्ही घेतलेल्या निर्णयाचे मला समाधान वाटते.अवयवदान या महान कार्याचा प्रसार व प्रचार आम्ही आमच्या गावात करणार आहोत.
चाळीस वर्षीय युवक सचिन कामटे यांना मेंदूत रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मेंदूमृत घोषित केले. त्यांच्या कुटुंबीयांना अवयवदानाबाबत पूर्वीपासूनच माहिती होती. डॉ. अबनावे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि सख्ख्या भावाने अवयवदानाचा निर्णय घेतला.
सचिन हे केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारे व्यक्ती नव्हते, तर समाजासाठीही काहीतरी करण्याची त्यांची नेहमीच धडपड होती. लोकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात या उद्देशाने त्यांनी आपल्या सख्ख्या भावासोबत मिळून ‘दुर्गा ॲग्रो फूड्स’ कंपनीची स्थापना केली होती. मागील सुमारे १५ वर्षांपासून ते स्वतः या कंपनीचे काम आपल्या भावासोबत पाहत होते. त्यांच्या कंपनीमध्ये जवळपास ५० लोक कार्यरत होते.यासोबतच सचिन यांचे स्वतःचे भाजीचे दुकानही होते, तेही ते नियमितपणे सांभाळत होते. व्यवसाय, कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्या अशा सर्व गोष्टी ते मेहनतीने पार पाडत होते.
सचिन यांना १४ वर्षांचा मुलगा आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याच्या दुःखद प्रसंगीही त्यांच्या पत्नी आणि भावाने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे दोन मूत्रपिंडांचे दान करण्यात आले आणि त्यामुळे दोन गरजू रुग्णांना नवजीवनाची आशा मिळाली.
सचिन कामटे यांनी आपल्या आयुष्यात अनेकांना रोजगाराची संधी दिली; आणि मृत्यूनंतरही त्यांच्या अवयवदानामुळे दोन व्यक्तींना नवजीवन मिळाले. त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांच्या कुटुंबीयांचा हा निर्णय समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.


