पुणे, दि. १० : पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्या राज्यात सर्वाधिक असून, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींवर सुनावणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे राबविताना दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील दावे व हरकतींवरील सुनावणी प्रक्रियेच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, रोहयो सहआयुक्त तथा नोडल अधिकारी संजीव पलांडे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी विक्रांत बगाडे , उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.
श्रीमती तेली-उगले म्हणाल्या, प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी योग्य नियोजन करून वेळापत्रक निश्चित करावे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करावे. मतदार यादीतील विसंगती शोधण्याचे काम सुरू करावे. नोटीस बजावताना ती संबंधित मतदारापर्यंत पोहोचेल, याची दक्षता घ्यावी. एकही पात्र मतदार मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहणार नाही, तसेच भारतीय नसलेला अपात्र मतदार यादीत समाविष्ट होणार नाही यासाठी बारकाईने नियोजन करावे.
सुनावणीदरम्यान मतदारांना नम्रपणे आणि योग्य मार्गदर्शन करावे. सुनावणीशी संबंधित सर्व तपशील सुरक्षितपणे जतन करावेत. कोणत्याही आमिषाला बळी न पडता निःपक्षपातीपणे काम पूर्ण होईल, याची सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. मृत व्यक्तीच्या बाबतीत आवश्यक पुरावे प्राप्त झाल्याशिवाय मतदार यादीतून नाव वगळू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय महत्त्वाच्या व्यक्तींची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी. स्वीप उपक्रमांवर विशेष भर देऊन नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी प्रयत्न करावेत. लोकप्रतिनिधींशी नियमित संवाद ठेवावा. काम करताना येणाऱ्या अडचणी व शंकांबाबत परस्पर चर्चा करून त्यांचे निरसन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर यांनी जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी, एएसडीडी यादी तसेच नियुक्त मनुष्यबळाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
बैठकीस जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
००००


