Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाइप 2 मधुमेह असलेल्या भारतीय प्रौढांवर मानसिक ताण - फ्रीडम फ्रॉम डायबेटिस...

टाइप 2 मधुमेह असलेल्या भारतीय प्रौढांवर मानसिक ताण – फ्रीडम फ्रॉम डायबेटिस रिसर्च फाउंडेशन चा अभ्यास

पुणे, 11 सप्टेंबर 2026 : पुणे स्थित फ्रीडम फ्रॉम डायबेटिस रिसर्च फाऊंडेशन ने केलेल्या एका नव्या अभ्यासात टाइप 2 मधुमेह असलेल्या भारतीय प्रौढांमध्ये मानसिक ताण असल्याचे स्पष्ट झाले आहे. अभ्यास करणाऱ्या टीम मध्ये बेबी शर्मा, डॉ.प्रमोद त्रिपाठी, डॉ.निधी कदम, डॉ.दिप्तीका तिवारी, अनघा व्यवहारे,डॉ. तेजस काथ्रीकोली, डॉ.मल्हार गानला आणि डॉ.बन्शी साबू यांचा समावेश होता. डिसेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या एक वर्षाच्या कालावधीत पुण्यातील फ्रीडम फ्रॉम डायबेटिस क्लिनिक येथे ऑनलाइन मधुमेह व्यवस्थापन कार्यक्रमात सहभागी झालेल्या टाइप 2 मधुमेह असलेल्या 1925 प्रौढांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला. या अभ्यासाचे निष्कर्ष 18 ऑगस्ट 2026 रोजी बीएमजे पब्लिक हेल्थ मध्ये प्रकाशित झाले.

 

या क्रॉस-सेक्शनल (पारच्छेदित) अभ्यासामध्ये प्रमाणित मूल्यांकन पद्धतींच्या माध्यमातून मधुमेहाशी संबंधित मानसिक ताण, नैराश्य आणि चिंता यांचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासात सहभागींपैकी 53.1 टक्के जणांना मधुमेहाशी संबंधित मानसिक ताण, 20.3 टक्के जणांना नैराश्य, तर 17.3 टक्के जणांना चिंता असल्याचे आढळून आले. या अभ्यासामध्ये मानसिक ताण, नैराश्य आणि चिंता मोठ्या प्रमाणात एकत्र आढळल्याचे दिसून आले. एकूण सहभागींपैकी 7.5 टक्के जण एकाच वेळी या तीनही स्थितींनी प्रभावित होते. त्यामुळे मधुमेहासोबत निर्माण होणाऱ्या मानसिक आव्हानांचे परस्परसंबंध अधोरेखित झाले.

 

45 वर्षांखालील व्यक्ती, महिला, रक्तातील साखरेचे नियंत्रण योग्य नसलेले रुग्ण आणि इन्सुलिनचा वापर करणारे रुग्ण यांच्यामध्ये मानसिक ताणाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. याशिवाय, नैराश्याचा कोणताही पूर्व इतिहास नसणे आणि त्याचवेळी जाणवणारा अधिक मानसिक ताण यांच्यातही संबंध असल्याचे संशोधकांना आढळून आले. अभ्यासकांनी या सुरूवातीच्या निरीक्षणाचे वर्णन एक गृहितक (अंदाज) मांडण्यास चालना देणारे आणि पुढील अभ्यासाची गरज अधोरेखित करणारे असे केले आहे.

 

डॉ.प्रमोद त्रिपाठी म्हणाले की, मधुमेहाचे व्यवस्थापन केवळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यापुरते मर्यादित असू शकत नाही. मधुमेहासोबत निर्माण होणाऱ्या भावनिक आणि मानसिक समस्यांची दखल घेण्याचे महत्त्व हा अभ्यास अधोरेखित करतो. मानसिक आरोग्याची नियमित तपासणी केल्यास या समस्या सुरुवातीच्या टप्प्यावर ओळखता येऊ शकतात आणि रूग्णावर सर्वसमावेशक व रूग्ण-केंद्रित उपचार करण्यास मदत होऊ शकते.

 

मधुमेहाच्या उपचार पद्धतीमध्ये मानसिक आरोग्याच्या नियमित व सर्वसमावेशक तपासणीचा समावेश करण्याचे महत्त्व संशोधकांनी अधोरेखित केले आहे.

 

Link to full paper: https://bmjpublichealth.bmj.com/content/4/3/e004824

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments