पुणे, भारत: बीव्हीजी इंडिया लिमिटेडकडे राजस्थानातील चंबळ रिव्हरफ्रंटलगतच्या दोन पर्यटनस्थळांच्या एकात्मिक विकास आणि सुशोभीकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये चंबळ गार्डन पुनर्विकास प्रकल्प आणि भीतरिया कुंड गार्डन यांचा समावेश आहे. एकत्रितपणे, या प्रकल्पांद्वारे पर्यटनाला चालना देणे, वारसा जतन करणे, पर्यावरणीय शाश्वतता बळकट करणे आणि शहरी जीवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशाने सार्वजनिक जागांची निर्मिती करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे.
भारतातील विविध शहरांमध्ये नदीकिनारे शहरी पुनरुज्जीवनाला चालना देणारे घटक म्हणून उदयास येत आहेत. केवळ मनोरंजनाच्या जागांपुरते मर्यादित न राहता, ही ठिकाणे समुदायाचा सहभाग वाढवणे, जैवविविधता सुधारणे, स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करणे आणि नागरिकांचा निसर्गाशी पुन्हा संबंध जोडणे या उद्देशाने सार्वजनिक पर्यटनस्थळांमध्ये रूपांतरित होत आहेत. चंबळ रिव्हरफ्रंट प्रकल्पांद्वारे अधिक हिरवीगार, राहण्यासाठी अधिक अनुकूल आणि नागरिककेंद्रित शहरे निर्माण करण्याच्या बदलत्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब उमटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
चंबळ गार्डनचे नव्याने रूपांतर
सुमारे 22 एकर क्षेत्रात विस्तारलेला चंबळ गार्डन पुनर्विकास प्रकल्प मनोरंजन आणि पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्याची अपेक्षा आहे. येथे स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांना विविध प्रकारचे अविस्मरणीय अनुभव उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या पुनर्विकास प्रकल्पामध्ये लँडस्केप्ड प्रोमेनेड्स, गॅझिबो, कृत्रिम जलसाठे, लक्ष्मण झुल्यावर आधारित झुलता पूल, विहंगम दृश्याचा अनुभव देणारा ग्लास ब्रिज, इमर्सिव्ह प्रकाश व ध्वनी कार्यक्रमासह प्रोजेक्शन मॅपिंग, रेस्टॉरंट्स, मुलांसाठी क्रीडांगण, साहसी उपक्रमांसाठीची क्षेत्रे, योगा पार्क, मियावाकी अर्बन फॉरेस्ट, आधुनिक पार्किंग सुविधा, वास्तुशास्त्रीय रचनेनुसार तयार करण्यात येणारी प्रवेशद्वारे तसेच सर्वसमावेशक लँडस्केपिंग आणि प्रकाशयोजना यांचा समावेश असणार आहे.
शाश्वतता आणि समुदायाच्या कल्याणाच्या तत्त्वांवर आधारित या प्रकल्पामध्ये मनोरंजन, आरोग्यस्वास्थ्य आणि निसर्ग यांचा समन्वय साधणारे आकर्षक सार्वजनिक पर्यटनस्थळ निर्माण करण्याचा उद्देश आहे.
भीतरिया कुंडचा वारसा जतन
सुमारे 8 एकर क्षेत्रात विस्तारलेले भीतरिया कुंड गार्डन हे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले प्राचीन भगवान शिव मंदिराचे ठिकाण आहे.
या प्रकल्पामध्ये मंदिराचे जतन, जीर्णोद्धार करण्यावर आणि पारंपरिक दगडी कोरीवकामाचे पुनर्स्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासोबतच सुधारित मार्गिका, पर्यटकांसाठी सुविधा, उद्याने आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील सार्वजनिक जागांच्या माध्यमातून परिसरातील लँडस्केपमध्ये सुधारणा केली जाणार आहे. या स्थळाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासोबतच पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्याचा उद्देश आहे.
शाश्वत सार्वजनिक जागांची निर्मिती
हे प्रकल्प भारताच्या व्यापक शाश्वतता विषयक धोरणाशी सुसंगत आहेत. त्यामध्ये मिशन LiFE, स्वच्छ भारत मिशन तसेच हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यास सक्षम आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर करणाऱ्या शहरी पायाभूत सुविधांवर वाढता भर यांचा समावेश आहे. स्थानिक प्रजातींचे लँडस्केपिंग, हरित क्षेत्रे, जैवविविधतेत वाढ आणि पर्यावरणपूरक रचनेच्या माध्यमातून दीर्घकालीन पर्यावरणीय आणि सामाजिक मूल्य निर्माण करणाऱ्या सार्वजनिक परिसंस्थांची निर्मिती अपेक्षित आहे.
दोन्ही प्रकल्पांसाठी नियोजन सहाय्य, बांधकामे, लँडस्केप विकास, वारसा स्थळ जीर्णोद्धार, पायाभूत सुविधा निर्मिती आणि आधुनिक सार्वजनिक सुविधांची उभारणी व पूर्तता यांसह सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या अंमलबजावणीची आणि एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापनाची जबाबदारी बीव्हीजी इंडियाची आहे.
या विकासाबाबत भाष्य करताना बीव्हीजी इंडिया लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुपल सिन्हा म्हणाल्या, “सार्वजनिक जागा शहरी जीवनाच्या गुणवत्तेत कशा प्रकारे योगदान देऊ शकतात, याची भारतामधील शहरे नव्याने व्याख्या करत आहेत. आमच्या मते, रिव्हरफ्रंट्स वा नदीकिनारे आता केवळ मनोरंजनाच्या सुविधा पुरविणाऱ्या जागा राहिलेल्या नाहीत; ती वारसा जतन करणारी, पर्यटनाला बळ देणारी, पर्यावरणीय शाश्वतता सुधारणारी आणि अधिक सक्षम समुदायांच्या निर्मितीला चालना देणारी पर्यटनस्थळे बनत आहेत. चंबळ रिव्हरफ्रंट प्रकल्पांच्या माध्यमातून या संकल्पनेत योगदान देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सौंदर्यदृष्ट्या प्रेरणादायी, पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदार आणि येणाऱ्या पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केली जाणारी पर्यटनस्थळे निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
चंबळ रिव्हरफ्रंट प्रकल्प हे केवळ सुशोभीकरणाचे उपक्रम नाहीत. वारसा, पर्यावरणीय परिसंस्था आणि विचारपूर्वक केलेली शहरी रचना यांचा समन्वय साधून समाज जीवन समृद्ध करणाऱ्या, पर्यटनाला आकर्षित करणाऱ्या आणि अधिक हिरवीगार व शाश्वत शहरे निर्माण करण्याच्या भारताच्या प्रवासाला हातभार लावणाऱ्या सार्वजनिक जागांची निर्मिती कशी करता येऊ शकते याचे दर्शन घडविण्याचा या प्रकल्पांचा उद्दे
श आहे.
***


