पुणे, दि.६: महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर फलक लावण्यास जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अन्वये निर्बंध लागू केले आहेत.
या आदेशान्वये फिरत्या वाहनांवर पक्षप्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंडो स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपा पासून दोन फूट उंची पेक्षा जास्त असणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा. फिरत्या वाहनांवर लावायचा पक्षप्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांनी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर लावता येणार नाही.
हे आदेश पुणे जिल्ह्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील कलम २२३ मधील तरतुदीनुसार दंडनीय कारवाईस पात्र राहतील.
०००


