Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे ग्रोथ हबच्या विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून...

पुणे ग्रोथ हबच्या विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून आढावा*

 

 

*नोव्हेंबरअखेर बृहद् आराखडा केंद्र शासनाकडे सादर करणार; पहिल्या टप्प्यात पाच हजार कोटींच्या निधीची मागणी*

 

पुणे, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) : पुणे महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करून पुण्याला जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रोथ हब’ उपक्रमाच्या विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

 

या बैठकीत माजी मुख्य सचिव तथा सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ.नितीन करीर, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

 

नीती आयोगाच्या पुढाकाराने देशातील मुंबई, सुरत, वाराणसी आणि विशाखापट्टणम् या शहरांमध्ये ग्रोथ हब उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामध्ये पुण्याचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र शासन, नीती आयोग आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीची बैठक आज पार पडली.

 

पुणे महानगर प्रदेशातील औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, शिक्षण, विमान वाहतूक, आरोग्य, कृषी आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांतील विकासाच्या संधी विचारात घेऊन हा आराखडा तयार करण्यात येत आहे. सर्व संबंधित विभागांच्या सूचना आणि प्रस्तावांचा विचार करून विकासाची दिशा निश्चित केली जात आहे.

 

येत्या नोव्हेंबरअखेर पुणे ग्रोथ हबचा बृहद् विकास आराखडा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीमार्फत केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून पाच हजार कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

 

सन २०३६ पर्यंतच्या पुढील दहा वर्षांच्या कालावधीत या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक अपेक्षित आहे. या गुंतवणुकीतून पुणे महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा, उद्योग आणि विविध क्षेत्रांचा विकास साधून पुण्याला जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments