कोथरुड मधील वाहतूक समस्यांसंदर्भात दर आठवड्याला बैठक* *वाहतूक समस्यांसंदर्भात सर्वांना एक व्हॉट्सॲप नंबर द्या!* *नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश*

तारां कित Avatar

 

 

कोथरुड मधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य क्रम ठरवून जलदगतीने उपाययोजना कराव्यात. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने व्हॉट्सॲप नंबर उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून त्याद्वारे ही वाहतूक नियमन करणे शक्य होईल असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. कोथरुड मधील वाहतूक समस्यांसंदर्भात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे यांच्या सह वाहतूक पोलीस अधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

 

बैठकीच्या सुरुवातीला अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी कोथरूड मधील मुख्य रस्त्यांवरून प्रतिदिन एक लाख ४० हजार वाहने फिरत असल्याचे सांगून वाहतूक नियमनासाठीच्या उपाययोजनांचे सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने पौड रोड आणि कर्वे रोड येथील अभिनव चौकच्या दोन्ही बाजूचा रस्ता रुंद करणे, आनंद नगर मेट्रो स्टेशन जवळ पौड रोड रुंद करणे, कर्वे पुतळा पौड रस्त्याचे डावे वळण रुंद करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कर्वेनगर ते वारजे पर्यंतचा रस्ता रुंद करणे किंवा सदर ठिकाणी उड्डाणपूल उभारणे, कमीन्स गेट समोरील डी.पी. रस्ता रुंद करणे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोरील रस्ता रुंद करणे, यांसह वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी कोथरुड मधील मिसिंग लिंक शोधून त्या पूर्ण करणे. तसेच, रस्ता रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी जमीन हस्तांतरण आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस आणि महापालिकेच्या रस्ते विभाग आणि पथ विभागाने समस्यांचे निराकरण करावे आदी उपाययोजना सुचविल्या.

 

त्यावर, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड मधील वाहतूक कोंडीची समस्या अतिशय गंभीर असून, प्रशासनाने दोन पर्यायांवर काम करावे. त्यामध्ये दीर्घ कालीन उपाययोजनांचा सविस्तर अभ्यास करुन अहवाल सादर करावा. त्यातील निष्कर्षांच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन मार्ग काढू.‌ त्यासोबतच तातडीने पूर्ण होऊ शकणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य क्रम ठरवून काम करावे. तसेच, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने व्हॉट्सॲप नंबर उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून त्याद्वारे ही वाहतूक नियमन करणे शक्य होईल, असे निर्देश दिले.त्याशिवाय कोथरुड मधील वाहतूक समस्यांसंदर्भात दर आठवड्याला प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 

तसेच, वाहतूक शाखेला मनुष्यबळ कमी पडत असल्याने वॉर्डनची संख्या वाढवावी. त्याशिवाय वाहतूक नियमनासंदर्भात जनजागृतीसाठी एनएसएसची मदत घ्यावी अशीही सूचना केली. तसेच, कोथरुड मधील वाहतूक समस्या सोडविण्यासंदर्भात प्रशासन आणि नागरीक यांच्या मधील दुवा म्हणून संदीप खर्डेकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली.

 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कर्वे रस्त्यावरील पौड फाट्याजवळ अपघाताचाही घटना घडली. एका टेम्पो चालकाने दारूच्या नशेत गाडी चालवून अनेक गाड्यांना धडक दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे यांच्या पत्नी गीतांजली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले. त्याबद्दल दु:ख व्यक्त करुन गीतांजली अमराळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Tagged in :

तारां कित Avatar