*
पुणे, दि. १४ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून पुणे कॅन्टोमेंट मतदार संघातील मतदारांना त्यांची मतदान केंद्रे व अनुक्रमांक या तपशीलाची माहिती सुलभरितीने उपलब्ध होण्याकरिता निवडणूक कार्यालयामार्फत बुथ लेव्हल ऑफिसर्स कडून मतदार चिठ्ठ्यांचे वाटप सुरु करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी दिली.
पुणे कॅन्टोमेंट मतदार संघात एकूण संख्या २ लाख ९५ हजार ३८२ मतदार असून २७४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित मतदान केंद्रांच्या बीएलओमार्फत मतदारांना मतदार चिठ्ठयांचे घरोघरी वाटप करण्यात येत आहे.
मतदारांची मतदान केंद्र व अनुक्रमांक शोधण्याची ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रशासनाने मतदार संघातील २५ पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली मतदानापूर्वीच मतदार चिठ्ठया घरपोच करण्याची कार्यवाही एकूण २७४ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत सुरु असल्याची माहिती महसूल सहायक एस.के. लिपारे यांनी सांगितले. या मतदार चिठ्ठीवर मतदाराची माहिती, मतदान केंद्राचे ठिकाण, मतदानाची तारीख व वेळ यांचा समावेश आहे.
000


