पुणे, 27 फेब्रुवारी 2025
महाविद्यालयात गेल्यानंतर मुलांचे कसे होईल याचा अनावश्यक विचार न करता आनंददायी, ताणरहित, सहजगत्या शिक्षण हवे असेल तर मराठी भाषेला पर्याय नाही असे मत अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी व्यक्त केले.
सुमित यांचे ‘मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर शाळेत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मुख्याध्यापिका अमिता दाते, शाला समितीचे अनिल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुमित म्हणाल्या, “एखाद्या गोष्टीला भिडताना काय करावे लागेल हे शाळेच्या दहा वर्षांत मुले शिकत असतात. त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ झालेली असते. कसे शिकायचे हे त्यांना समजलेले असते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणात मुलांचे काय होईल याची अनाठायी भीती बाळगू नये.”
त्या पुढे म्हणाल्या, “अशैक्षणिक कामे असतानाही मराठी माध्यमाचे शिक्षक सुंदर पद्धतीने काम करत आहेत. मुलांना केवळ त्यांच्यावर सोपवू नका. पालकांनी शिक्षकांबरोबर उभे राहिले पाहिजे.”
रुपाली शुक्ल यांनी सूत्रसंचालन, सायली फाटक यांनी आभार प्रदर्शन आणि विदुला आवटे पुजारी यांनी परिचय करुन दिला.


