नवकल्पना व निर्यात यांद्वारे भारताची जागतिक गेमिंग नेतृत्वाकडे वाटचाल
· भारताच्या १ ट्रिलियन डॉलर्सच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या धोरणाचा मुख्य आधार होणार गेमिंग क्षेत्र
भारताने आज अधिकृतपणे इंडिया गेमिंग रिपोर्ट २०२५ प्रसिद्ध केला. विन्झो आणि इंटरअॅक्टिव्ह एंटरटेनमेंट अँड इनोव्हेशन कौन्सिल (आयईआयसी) यांनी संयुक्तपणे तयार केलेला हा अभ्यास अहवाल एक महत्त्वाचा टप्पा असून, २०३४ पर्यंत भारताचे गेमिंग क्षेत्र तब्बल ६० अब्ज डॉलर्सचे बाजारमूल्य गाठेल, असे भाकीत त्यात करण्यात आले आहे. २०२४ या वर्षीच्या आकडेवारीनुसार, या क्षेत्राचे मूल्य ३.७ अब्ज डॉलर्स असून, त्यात २०२४ ते २०२९ या आर्थिक वर्षांच्या कालावधीत त्यांत अंदाजे १९.६ टक्क्यांच्या चक्रवाढ दराने वाढ होत आहे. हे क्षेत्र २०२९ पर्यंत ९.१ अब्ज डॉलर्स पार करेल, असा अंदाज आहे. या क्षेत्रात सध्या १,८८८ गेमिंग कंपन्या आहेत. त्यांत १.३ लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि या कंपन्यांचे सुमारे ६० कोटी वापरकर्ते आहेत. वापरकर्त्यांची ही संख्या ९५.२ कोटींवर जाण्याचा अंदाज २०२९पर्यंत वर्तवण्यात आला आहे.
या अहवालामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की योग्य नियमावली, गुंतवणूक व नवोन्मेष वातावरण असल्यास,
· उच्च-कौशल्य अंगी असणाऱ्या २० लाखांहून अधिक तरुणांना हे क्षेत्र रोजगार देऊ शकते. यामध्ये मेक इन इंडिया तंत्रज्ञान व बौद्धिक संपदा निर्माण होऊन निर्यात साधता येईल.
· ३ वर्षांत आयपीओद्वारे २६ अब्ज डॉलर्स गुंतवणूक मूल्य निर्माण होऊ शकते.
· जागतिक गेमिंग अर्थव्यवस्थेतील भारताचा सध्याचा १.१ टक्के हिस्सा २०३४ पर्यंत २० टक्क्यांवर जाऊ शकतो.
विन्झोचे सह-संस्थापक पावन नंदा यांनी वेव्हज २०२५ या भारतातील आघाडीच्या मीडिया आणि एंटरटेनमेंट (एम अॅंड ई) परिषदेच्या उद्घाटनावेळी सांगितले, “भारताची भूमिका केवळ ग्राहक म्हणून नव्हे, तर गेमिंग बौद्धिक संपत्तीचा जागतिक उत्पादक व निर्यातदार म्हणून इंडिया गेमिंग रिपोर्ट २०२५ मध्ये स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे. देशांतर्गत बाजाराचा उत्साही प्रतिसाद आणि जागतिक महत्त्वाकांक्षा यांसह भारत डिजिटल मनोरंजनाच्या पुढील युगाचे नेतृत्व करू शकतो.”
आजपर्यंत भारताच्या गेमिंग क्षेत्रात आलेल्या सुमारे ३ अब्ज डॉलर्स परकीय थेट गुंतवणुकीपैकी (एफडीआय) ९० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक ‘पे-टू-प्ले’ (खऱ्या पैशांत खेळणे) या प्रकारात झालेली आहे, असेही या अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. ‘पे-टू-प्ले’ हे भारतातच उदयास आलेला एक मायक्रो ट्रान्झॅक्शनवर आधारित पैसे मिळविण्याचे एक मॉडेल आहे. यूपीआयच्या (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) यशावर ते आधारलेले आहे. भारतातील गेमिंग क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम ठरवण्यात ते अत्यंत निर्णायक ठरलेले आहे.
भारतीय बाजारपेठेत गेमिंगच्या वापराच्या प्रमाणाशी तुलना केली असता, इन-ॲप खरेदी आणि जाहिरात-आधारित उत्पन्न यांसारखे पारंपरिक कमाईचे मार्ग फारसे परिणामकारक ठरले नाहीत. या पार्श्वभूमीवर, पे-टू-प्ले ही एक भारतासारख्या बाजारासाठी साजेशी नवकल्पना उदयास आली. तिने कमाईतील दरी भरून काढली. या मॉडेलमुळे या क्षेत्राला सातत्यपूर्ण आर्थिक आधार मिळाला, जागतिक गुंतवणूक आकर्षित झाली, आणि भारतीय गेमिंग कंपन्यांचा देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झपाट्याने विकास झाला.
आज गेमिंग क्षेत्र भारताच्या १२.५ अब्ज डॉलर्सच्या ‘नवमाध्यम’ (न्यू मीडिया) बाजारातील २९.६ टक्के हिस्सा राखून आहे. हा हिस्सा ओटीटी, ऑडिओ, अॅनिमेशन आणि सोशल मीडियापेक्षाही मोठा आहे. जागतिक पातळीवर, ३०० अब्ज डॉलर्सच्या गेमिंग उद्योगाने आधीच चित्रपट व संगीत क्षेत्रांच्या एकत्रित उत्पन्नालाही मागे टाकले आहे. अहवालात फिनलंड, इस्राईल आणि तुर्कस्तान यांसारख्या देशांचा दाखला देण्यात आला आहे, जिथे लोकसंख्या कमी असूनही ९० टक्क्यांहून अधिक गेमिंग उत्पन्न निर्यातीतून मिळते. या संदर्भात भारताकडे प्रचंड देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक स्पर्धेत उभे राहण्याची वाढती क्षमता, अशी दुहेरी संधी आहे. यामुळे भारत स्थानिक वापर आणि जागतिक निर्यात या दोन्ही आधारांवर चालणारे एक दुहेरी इंजिन तयार करू शकतो, आणि भारतीय गेमिंग बौद्धिक संपदेला (आयपी) जगाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत एक महत्त्वाचे स्थान मिळवून देऊ शकतो.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गतिशील नेतृत्व लाभलेला भारत डिजिटल नवोपक्रमाच्या पुढील टप्प्याचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. भारताच्या १ ट्रिलियन डॉलर्सच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत ‘गेमिंग’ हे क्षेत्र केंद्रस्थानी असेल,” असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी या अहवालाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे.
अहवालात पुढे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की नवोपक्रमाला प्रोत्साहन देणारी स्पष्ट नियमावली आणि समर्थक करधोरणे ही या क्षेत्राच्या पुढील झेपेसाठी अत्यावश्यक ठरणार आहेत. योग्य नियामक आराखड्याच्या मदतीने, भारतीय गेमिंग कंपन्या शेअर बाजारात प्रवेश करून, वेगवेगळ्या क्षेत्रांतील एफडीआय (परकीय थेट गुंतवणूक) आकर्षित करून, अभूतपूर्व गुंतवणूक परतावा निर्माण करू शकतात. या संदर्भात भारताची पहिली आणि सार्वजनिकरित्या सूचीबद्ध असलेली सध्या एकमेव असलेली गेमिंग कंपनी नझारा टेक्नॉलॉजीज हिचे उदाहरण घेता येईल. या कंपनीच्या मूल्यांकनाच्या आधारावर असे म्हणता येते, की या क्षेत्रातील अनुभवी कंपन्यांचे गुंतवणूक मूल्य प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) ३ वर्षांत २६ अब्ज डॉलर्स इतके निर्माण करता येऊ शकते. नझारा टेक्नॉलॉजीजला आंतरराष्ट्रीय स्तरावर सूचीबद्ध गेमिंग कंपन्यांमध्ये सर्वोच्च दर्जाचा प्रीमियम मिळाला आहे. भारतीय गेमिंग क्षेत्राच्या संभाव्यतेबाबत बाजारातील आत्मविश्वास या कंपनीच्या रुपाने दिसून येतो.
“भारतीय गेमिंग क्षेत्र हे ‘बॉक्स’ नव्हे तर ‘बाइट्स’ निर्यात करते — ही डिजिटल अर्थव्यवस्थेतील भारताची अनोखी ताकद आहे,” असे पावन नंदा यांनी नमूद केले. “योग्य दिशा आणि पाठबळ मिळाल्यास, भारतीय गेमिंग कंपन्या पुढील दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत जागतिक स्तरावर बौद्धिक संपदा (आयपी) निर्माणात आघाडी घेऊ शकतात, आणि भारताला ३०० अब्ज डॉलर्सच्या जागतिक गेमिंग अर्थव्यवस्थेच्या अग्रभागी नेऊ शकतात. अतुलनीय आणि मजबूत पायाभूत रचनेवर उभारलेले हे क्षेत्र पुढील २ ते ३ वर्षांत सार्वजनिक बाजारामध्ये २५ ते ३० अब्ज डॉलर्स इतके गुंतवणूक मूल्य उघड करण्यास सज्ज आहे. त्यातून डिजिटल मनोरंजन क्रांतीत भारताचे वर्चस्व भक्कम होईल,” असेही नंदा म्हणाले.
जागतिक मीडिया व मनोरंजन (एम अॅंड ई) क्षेत्रातील दिग्गज मुंबईत वेव्हजसाठी एकत्र आले आहेत, आणि भारताचा जागतिक मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग परिसंस्थेतील वाढता प्रभाव ते अधोरेखित करत आहेत, अशा अत्यंत निर्णायक टप्प्यावर इंडिया गेमिंग रिपोर्ट २०२५चे प्रकाशन होत आहे, हे फार महत्त्वाचे आहे.


