पुणे, १५ जानेवारी २०२६: माजी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची बहुप्रतिक्षित बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ साठी सदिच्छादूत (Goodwill Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची रोड सायकलिंग स्पर्धा असून ती १९ ते २३ जानेवारी दरम्यान पुण्यात होणार आहे.
धोनी यांचा या स्पर्धेशी संबंध अशा वेळी प्रस्थापित होत आहे, जेव्हा भारत जागतिक व्यावसायिक सायकलिंग कॅलेंडरवर आपली भक्कम उपस्थिती नोंदवत आहे. सदिच्छादूत म्हणून धोनी बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ची ओळख आणि प्रतिष्ठा वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील तसेच विशेषतः युवा खेळाडूंमध्ये सायकलिंगबद्दल उत्साह निर्माण करतील. जागतिक व्यावसायिक सायकलिंग क्षेत्रात भारतासाठी हा एक निर्णायक टप्पा ठरत आहे.
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही भारतातील पहिलीच UCI 2.2 दर्जाची, पाच दिवसांची, बहुपर्यायी (multi-stage) पुरुषांची कॉन्टिनेंटल रोड सायकलिंग शर्यत आहे. या स्पर्धेमुळे भारताचे जागतिक व्यावसायिक सायकलिंग सर्किटवर ठळक स्थान निर्माण होत आहे. ४३७ किमी लांबीचा हा मार्ग दख्खन पठार आणि सह्याद्री पर्वतरांगांमधून जाणार असून, तीव्र वळणं आणि आव्हानात्मक चढ-उतार यांचा समावेश आहे. या स्पर्धेत ३५ देशांतील २९ संघांचे एकूण १७१ सायकलपटू सहभागी होत आहेत.
फिटनेस, शिस्त आणि सहनशक्ती यांवर नेहमीच भर देणाऱ्या धोनी यांच्या मूल्यांशी स्पर्धात्मक सायकलिंगचे स्वरूप पूर्णपणे सुसंगत आहे. त्यांच्या सहभागामुळे या स्पर्धेला अधिक विश्वासार्हता आणि व्यापक प्रसिद्धी मिळणार असून, भारतातील सायकलिंगच्या विकासासाठी ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे.
आपल्या सहभागाबद्दल बोलताना एम.एस. धोनी म्हणाले: “पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून सायकलिंग या खेळाच्या प्रचाराशी जोडले जात असल्याचा मला आनंद आहे. पुणे ग्रँड टूरच्या उदयामुळे भारत व्यावसायिक सायकलिंगमध्ये नव्या पर्वात प्रवेश करत आहे. या उपक्रमासाठी आयोजक आणि पुणे जिल्हा प्रशासनाला माझ्या शुभेच्छा, तसेच सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा. भारतीय राष्ट्रीय संघासाठी हा घरच्या प्रेक्षकांसमोर चमकण्याचा आणि देशासाठी गौरव मिळवण्याचा क्षण आहे.”
आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पेनचा बुर्गोस बुरपेल्लेट बीएच (Burgos Burpellet BH) हा प्रो-टीम आघाडीवर असून, तो UCI जागतिक क्रमवारीत २५ व्या क्रमांकावर आहे आणि बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ मधील सर्वाधिक मानांकित संघ आहे. त्यानंतर चीनचा ली निंग स्टार (क्रमांक ३६) आणि मलेशियाचा तेरेंगानू सायकलिंग टीम (क्रमांक ३७) सहभागी आहेत.
भारतीय आव्हानाचे नेतृत्व देशातील सर्वाधिक यशस्वी सायकलपटू नवीन जॉन भारतीय राष्ट्रीय संघाकडून करणार आहेत. यजमान भारताकडून दुसरा संघ इंडियन डेव्हलपमेंट टीम — देखील उतरवण्यात येणार असून, एकूण १२ भारतीय सायकलपटू आणि ४ पर्यायी खेळाडूंना घरच्या मैदानावर भारतातील पहिल्या UCI 2.2 स्पर्धेत आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ विषयी माहिती
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही भारतातील पहिलीच UCI 2.2 दर्जाची, पाच दिवसांची, बहुपर्यायी पुरुषांची कॉन्टिनेंटल सायकलिंग स्पर्धा असून, जागतिक व्यावसायिक सायकलिंगमध्ये भारताच्या उपस्थितीसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. दख्खन पठार आणि सह्याद्री पर्वतरांगांमधून जाणाऱ्या ४३७ किमीच्या कठीण मार्गावर ही स्पर्धा पार पडणार आहे. पाच खंडांतील ३५ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २९ संघांमधील १७१ अव्वल सायकलपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
ही स्पर्धा पुणे जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे पुण्याची सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि ग्रामीण पर्यटनाला चालना मिळणार असून, ९ तालुके आणि १५० गावांचा समावेश असलेल्या मार्गातून ही शर्यत पार पडणार आहे.
जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा
बजाज पुणे ग्रँड टूरच्या यशामागे मोठ्या प्रमाणावर केलेली पायाभूत सुविधांची सुधारणा ही प्रमुख बाब आहे. अवघ्या ७५ दिवसांत रस्त्यांची जलद बांधणी, सुधारणा आणि कडक सुरक्षा मानकांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. UCI च्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरक्षितता आणि दर्जेदार राइड सुनिश्चित करण्यासाठी हा जिल्हा-स्तरीय उपक्रम राबवण्यात आला आहे.
या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे पुणे आपली “भारताची सायकल कॅपिटल” ही ओळख पुन्हा अधोरेखित करत असून, शाश्वत शहरी-ग्रामीण विकासाचा आदर्श निर्माण करत भारताला आंतरराष्ट्रीय क्रीडा पर्यटन आणि व्यावसायिक सायकलिंगसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून स्थापित करत आहे.
शर्यतीचे टप्पे
* १९ जानेवारी २०२६: प्रोलॉग (७.५ किमी) – गुडलक चौक: संघांची पोल पोझिशन
* २० जानेवारी २०२६: टप्पा १ – मुळशी–मावळ माइल्स (८७.२ किमी, उंची ८२८ मी): हिंजवडी आयटी हबमधून जाणारा हा टप्पा सपाट स्प्रिंट्स आणि तीव्र शहरी वळणांचा संगम आहे.
• २१ जानेवारी २०२६: टप्पा २ – मराठा हेरिटेज सर्किट (१०५.३ किमी, उंची १०५१ मी): पुरंदर किल्ला, सिंहगड आणि खडकवासला धरणाच्या कठीण घाटांचा सामना करत हा दिवस सहनशक्तीची खरी परीक्षा ठरणार आहे.
• २२ जानेवारी २०२६: टप्पा ३ – वेस्टर्न घाट्स गेटवे (१३४ किमी, उंची १०२४ मी): पुरंदर ते बारामती दरम्यान दख्खन पठारावरून जाणारा वेगवान आणि रणनीतीपूर्ण टप्पा.
• २३ जानेवारी २०२६: टप्पा ४ – पुणे प्राइड लूप (९५ किमी, उंची ५७८ मी): शनिवारवाड्यासारख्या ऐतिहासिक स्थळांमधून जाणारा हा अंतिम टप्पा तांत्रिक विभाग आणि
थरारक समाप्तीने सजलेला असेल.


