पुणे (प्रतिनिधी):
“आई-वडील हेच आपले खरे दैवत असून त्यांची सेवा करणे हेच सर्वात मोठे पुण्याचे काम आहे. राष्ट्रभक्ती म्हणजे केवळ सीमेवर जाऊन लढणे नव्हे, तर आपल्या परिसरातील समस्या सोडवून समाजहितासाठी कार्य करणे, ही देखील मोठी देशसेवाच आहे,” असे प्रतिपादन महंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ महाराज यांनी केले.
कात्रज येथील जैन आगम मंदिर परिसरातील दुगड फार्म मैदानावर ‘आगम व अंजनी नगर’ हिंदू संमेलन समितीच्या वतीने भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. संमेलनानिमित्त भव्य ‘नववर्ष शोभायात्रा’ काढण्यात आली होती, ज्यामध्ये ७३० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. वीरशैव, पद्मशाली, तेली समाज आणि सेवालाल महाराज बिश्नोई समाजाचे चित्ररथ या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यांपासून प्रशिक्षण घेतलेल्या ९८ विद्यार्थ्यांनी लाठी-काठीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.
संगणक अभियंता डॉ. राधिका कुलकर्णी यांनी मातृशक्तीला मार्गदर्शन करताना ‘स्वदेशी’चा मंत्र दिला. “मुलांना पाश्चिमात्य खाद्यपदार्थांऐवजी भारतीय पौष्टिक अन्नाची सवय लावा. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जग जिंकण्याची ताकद नारीशक्तीमध्ये आहे,” असे त्यांनी नमूद केले. प्रमुख वक्ते श्री. निलेश धायरकर यांनी इतिहासाचे संदर्भ देत हिंदू समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले. “पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी घरात शिववंदना, पोथी-पुराणांचे वाचन आणि मंत्रजप करा,” असे त्यांनी सांगितले. या संमेलनासाठी परिसरातील २६ सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी एकत्र येत ‘सज्जनशक्ती’चे दर्शन घडवले. संमेलनाचे नियोजन संयोजक प्रवीण दुगड, मनोज माहोर आणि सागर वाघले यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने केले होते.
——————-


