पुणे, दि. २८: सिंचन व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी पाणी वापर संस्थांचे व्यवस्थापन कार्यक्षम असणे व पाणी वापर संस्थांनी स्वबळावर सुदृढ होणे आवश्यक आहे. या उद्देशाने दरवर्षी महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा योजना राबविण्यात येते.
राज्याच्या जलनीतीनुसार सिंचन व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असण्यासाठी सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. यास कायद्याचे पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ शासनाने पारित केला आहे.
या अभियानांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, साठवण तलाव कालवा, व नदीवरील वैयक्तिक अथवा सहकारी उपसा सिंचन प्रकल्पांना प्रथम व द्वितीय पुरस्कार दिले जातात.
पाणी वापर संस्था व्यवस्थापन स्पर्धेअंतर्गत प्रत्येक स्तरावर वितरित करण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या रकमेचा विनियोग करण्याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याअन्वये पुरस्कार रकमेच्या ५ टक्के रक्कम पाणी वापर संस्थेच्या प्रशासकीय व कार्यालयीन नवीन बाबींसाठी खर्च करता येईल. सामूहिक उपयोगाची यंत्रसामग्री उपकरणे तसेच प्रतीयंत्र खरेदी करण्यासाठी आमसभेच्या संमतीने निर्णय घेता येईल. घनमीटर पाण्यात जास्तीत जास्त कृषी उत्पादन करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक राहील. पुरस्काराच्या रकमेतून कोणत्याही परिस्थितीत पाणी वापर संस्थेच्या दैनंदिन स्वरूपाचा वापर करता येणार नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
००००


