पुणे,पुणेकरांवर लादलेल्या अघोषित पाणीकपातीबाबत खुलासा करणेबाबत.
आणि पटवर्धन बाग, एरंडवणे परिसरातील अपुऱ्या व कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्या बाबत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांना एक निवेदन दिले आहे ते खालील प्रमाणे आहे
प्रती,
मा. राजेंद्र भोसले,
आयुक्त, पुणे मनपा.
विषय – 1) पुणेकरांवर लादलेल्या अघोषित पाणीकपातीबाबत खुलासा करणेबाबत.
2) पटवर्धन बाग, एरंडवणे परिसरातील अपुऱ्या व कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्या बाबत….
मा. महोदय,
दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत “पुणेकरांना तूर्त पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही” असे जाहीर करण्यात आले. मा. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील हे स्पष्ट केले.मात्र गेले काही दिवस सकाळी 9 वाजता जाणारे पाणी हे 8 वाजताच जाते याच्या अनंत तक्रारी आल्यानंतर मनपा च्या पाणी पुरवठा खात्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ” पर्वती जलकेंद्राच्या पंपिंग स्टेशन मधून 4100 क्यूबिक मीटर ताशी च्या जागी 3800 क्यूबिक मीटर ताशी असा पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाणी लवकर जाते ” असे नावं जाहीर न करण्याच्या अटीवर स्पष्ट केले. ही माहिती सत्य आहे काय आणि ही अघोषित पाणीकपात आहे काय याचा आपण त्वरित खुलासा करावा व कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत काही माहिती देण्यात आली असल्यास ती देखील जाहीर करावी अशी आग्रही मागणी करत आहे.
तसेच एरंडवण्यातील पटवर्धन बाग परिसरात गेले काही दिवस कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असून याबाबत अनेकदा तक्रारी करून ही नेमका “गुताळ” कुठे आहे ते सापडत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तरी याबाबत देखील वरिष्ठ स्तरावरून त्वरित कार्यवाही व्हावी अशी मागणी करत आहे.
आपण चौकशी करून योग्य कार्यवाही कराल अशी खात्री आहे.अन्यथा उन्हाळ्याच्या झळा बसण्यापूर्वीच पुणेकरांना पाण्यासाठी वणवण करताना हंडे मोर्चे काढावे लागतील याची नोंद घ्यावी.


