पुणे , 14 डिसेंबर २०२३: पुण्यातील कलाप्रेमींसाठी ‘रंगरस बनारस’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. हे प्रदर्शन १९ ते २४ डिसेंबर दरम्यान राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन प्रख्यात वास्तुविशारद महेश नामपूरकर यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध चित्रकार उमाकांत कानडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनामध्ये संदीप यादव, प्रथमेश जोग आणि विनोद कोरे या कलाकारांच्या कुंचल्यांतून साकारलेल्या सुंदर आणि आध्यात्मिक वाराणसी घाटांच्या कलाकृती सादर करण्यात येणार आहेत. वॉटर कलर तसेच ऍक्रेलिक रंगांचा वापर करून साकारण्यात आलेल्या कलाकृती कला रसिकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार असून, कलाकारांच्या कुंचल्यांतून कॅनव्हासवर चित्रित केलेल्या वाराणसी येथील गंगा घाटचे सुंदर रूप यावेळी कलाप्रेमींना बघायला मिळेल.


