Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिंदू साम्राज्य दिनी गर्जला 'श्री शिवराज्याभिषेकाचा पोवाडा' श्री सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट आणि...

हिंदू साम्राज्य दिनी गर्जला ‘श्री शिवराज्याभिषेकाचा पोवाडा’ श्री सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे पोवाडा सादरीकरण व व्याख्यानाचे आयोजन

पुणे : हिंदवी राज्य स्थापून, मोठ्या हिमतीनं, शूर शिवाजीनं, राज्याभिषेक समारंभ खास, केला यथाविधी रायगड किल्ल्यास, ऐका शिवशाहीचा इतिहास… अशा शब्दात अंगावर रोमांच उभा करणारा श्री शिवराज्याभिषेकाचा पोवाडा सिद्धेश्वराच्या साक्षीने सादर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत हिंदवी स्वराज्याचा दैदिप्यमान इतिहास पुणेकरांनी पोवाडा आणि व्याख्यानाच्या माध्यमातून अनुभवला.

निमित्त होते, श्री सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन सोहळ्यानिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमाचे. कमला नेहरू रुग्णालयाजवळील श्री सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला शिवव्याख्याते पराग ठाकूर, प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मुकुंद पाटोळे, कसबा नगर संघचालक डॉ. दिपक रोकडे उपस्थित होते. प्रबोधिनीच्या महिला शाहीर सेवाव्रतींनी पोवाडा सादर केला.

पराग ठाकूर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम गुरु जिजामाता होत्या. त्यांनी आपला जन्म हा स्वराज्यासाठी झाला आहे, अशी शिकवण त्यांना दिली. स्वराज्य उभारणी करताना शिवरायांनी अनेक न्यायनिवाडे केले. स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेतले नाहीत, याची अनेक उदाहरणे आहेत.

ते पुढे म्हणाले, स्वराज्य उभे करताना शिवरायांना अनेक जीवाभावाचे सवंगडी मिळाले. त्यामुळेच हे स्वराज्य समर्थपणे उभे राहू शकले. सामान्य जनतेमध्ये देखील शिवरायांनी स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवले. त्यामुळेच आज ३५० वर्षांनंतर देखील शिवराज्याभिषेसारखी ऐतिहासिक घटना व त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्या स्मरणात आहेत, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृणालिनी दुसाने यांनी तर आभारप्रदर्शन वैशाली सोनवणे यांनी केले. शिववंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments